अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात तब्बल ४० दिवस सुरू असलेली सुनावणी काल(दि.१६) पूर्ण झाली. त्यानंतर १७ नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निर्णय येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपला परदेश दौरा रद्द केल्याचं वृत्त आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गोगोई परदेशात जाणार होते.

टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या आधारे याबाबतचं वृत्त दिलं आहे. अयोध्या जमीन विवाद प्रकरणावर खंडपीठाचे अध्यक्ष असलेल्या मुख्य न्यायाधीशांनी काही अनिवार्य कारणांमुळे आपला परदेश दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं आहे. १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी गोगोई हे काही दक्षिण अमेरिकी देशांमध्ये, मध्य पूर्व व काही अन्य देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. या नियोजित दौऱ्याला अंतिम स्वरुप मिळण्याआधीच गोगोई यांनी आपला परदेश दौरा रद्द केला. गोगोई यांनी गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी भारताचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.

दरम्यान, सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी काल पूर्ण झाली. तब्बल 40 दिवस याप्रकरणी रोज सुनावणी सुरु होती, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद काल पूर्ण झाला. हा खटला संवेदनशील असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अयोध्या प्रकरणी 17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.