03 March 2021

News Flash

राम जेठमलानींनी ‘या’ दिग्गजांची केलीय वकिली; किती घेतात ‘फी’? जाणून घ्या!

चर्चा तर होणारच!

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी. (संग्रहित)

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदा मंत्री राम जेठमलानी अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतात. यावेळी ते एका विशेष कारणाने चर्चेत आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. केजरीवाल यांच्या बाजुने राम जेठमलानी हे खटला लढवत आहेत. त्यापोटी जेठमलानी यांनी केजरीवालांच्या हातात थोडेथोडके नव्हे तर, ३.४२ कोटींचे बिल टेकले आहे. या बिलाच्या रकमेची जोरदार चर्चा आहे. त्यात दुसऱ्या दिवशी त्यांनी केजरीवालांकडून बिलाची रक्कम घेणार नाही, असे जाहीर केले. गरिबाकडून आपण पैसे घेत नाही, असे त्यांनी सांगितले. केजरीवालांच्या हाती ३.४२ कोटी रुपयांचे बिल देणाऱ्या राम जेठमलानी यांची फी किती? आणि त्यांनी कोणत्या दिग्गज व्यक्तींसाठी वकिली केली आहे, हे जाणून घ्या.

‘लीगली इंडिया’ने २०१५ साली दिल्लीमधील वकिली क्षेत्रातील ३२ कंपन्यांचे भागिदार आणि वकिलांशी चर्चा करून देशातील सर्वात महागडा वकील कोण आहे, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. लीगली इंडियाच्या अभ्यासानंतर देशात सर्वात महागडे वकील म्हणून राम जेठमलानी यांचे नाव समोर आले होते. एका अहवालानुसार, राम जेठमलानी हे सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयात केवळ एकदा हजर राहण्याचे सरासरी २५ लाख रुपये शुल्क घेतात. सध्या जेठमलानी यांनी वकिली क्षेत्रातून निवृत्ती घेतली असली तरी काही ‘खास’ व्यक्तींसाठीच ते कोणतेही शुल्क न घेता खटला लढवतात.

‘या’ व्यक्तींसाठी जेठमलानींनी वकिली केलीय!

> उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला

> १६ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला

> जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची बाजू न्यायालयात बाजू मांडली

> माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांच्याविरोधातील खटल्यात जेठमलानी यांनी या दोघांचीही बाजू मांडली

> सोहराबुद्दीन खटल्यात सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने ते न्यायालयात लढले

> २ जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली

> तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासाठीही ते न्यायालयात लढले

> कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येड़ियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात जेठमलानी यांनी त्यांची बाजू मांडली

> राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी व्ही. श्रीहरन (मुरुगन) याच्यासाठीही ते न्यायालयात हजर झाले

> शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली

माफिया डॉन हाजी मस्तानविरोधात तस्करीप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात त्यांनी मस्तानची बाजु मांडली

हवाला डायरी प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसाठीही न्यायालयात बाजू मांडली

चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद

सुब्रतो रॉय यांच्यातर्फेही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:40 pm

Web Title: ram jethmalani know his fees and famous clients arvind kejriwal
Next Stories
1 ‘मुस्लिम महिलांनी नोकरी करणे इस्लाम विरोधात’
2 पाकचे ‘शेपूट वाकडेच’!; काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर
3 नोटाबंदीच्या काळात १० लाख रूपये जमा केल्याप्रकरणी चर्मकाराला प्राप्तिकर विभागाची नोटीस
Just Now!
X