पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वेकडे बघण्याच्या धोरणानुसार आसाम राज्य भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या राज्याला विकसित राज्य म्हणून देशात पुढे न्यायचे आहे. त्यासाठी तेथील जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास मोलाचा असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला साफ डावलले असून, भाजप आघाडीवर विश्वास दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राम माधव यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आसाममधील लोकांना विकास आणि सुरक्षा हवी आहे. त्याचबरोबर त्यांना स्वतःची ओळखही जपायची आहे. या सर्व आघाड्यांवर भाजप सरकार काम करेल. आसामची ओळख जपायला, लोकांच्या जीवनात आनंद आणायला आणि राज्याची संस्कृती वाचवण्याला भाजपचे प्राधान्य असेल, असे राम माधव यांनी सांगितले.
देशात मागे पडलेल्या राज्यांना केंद्रातील भाजप सरकारला पुढे घेऊन जायचे आहे. विकसित राज्य म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण करायची आहे. त्यादृष्टिने आसाममधील विजय पक्षासाठी खूप महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.