अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्यानं देशभरात आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं सोशल मीडियातून दिसून आलं. पंतप्रधान मोदी यांचे फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यातील एका फोटोवरून काँग्रेसनं भाजपाला सवाल केला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत येताना दिसत आहे.

अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आणि काही शतकांनंतर राम मंदिर होत असल्यानं सोशल मीडियावर आनंद व्यक्त होताना दिसला. विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात हा निर्णय झाल्यानं पंतप्रधान मोदी यांचंही कौतुक होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू रामचंद्रांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. यात पंतप्रधान मोदी हे प्रभू रामचंद्रांचा हात धरून अयोध्येत येत आहेत.

आणखी वाचा- “ते एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करत आहे आणि आम्ही…”; ओमर अब्दुला संतापले

या फोटोवरून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे.
“नाही प्रेम शिकलात, नाही त्याग शिकला
ना करूणा घेतली, ना अनुराग शिकलात
स्वतःला रामापेक्षा मोठं दाखवून खुश होणाऱ्यांनो,
तुम्ही श्री राम चरित मानसमधील कोणता भाग शिकला आहात?,”
असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्विट; म्हणाले…

शशी थरूर यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भूमिपूजनानंतर एक ट्विट केलं होतं. “मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे.
राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही.
राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.
राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.