28 May 2020

News Flash

अयोध्येत राममंदिराचे शिलापूजन!

विश्व हिंदू परिषदेने गेल्या जून महिन्यात राम मंदिर उभारणीची घोषणा केली होती

| December 21, 2015 02:13 am

रामसेवकपुरम येथे रविवारी दोन ट्रक शिळा आणण्यात आल्या. महंत नृत्यगोपाल दास यांनी त्यांचे पूजन केले

विश्व हिंदू परिषदेची तयारी सुरू; मोदी सरकारची संमती असल्याचा दावा
अयोध्येत राम मंदिर उभारण्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच मंदिर उभारणीसाठी शिळा येऊ लागल्या आहेत. रविवारी धक्कादायकरीत्या दोन ट्रक शिळा येथे दाखल झाल्या असून, रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या हस्ते त्यांचे शिलापूजनही करण्यात आले. तसेच मोदी सरकारकडून आताच राममंदिर बांधण्याचे संकेत मिळाले आहेत, असा दावाही महंत नृत्यगोपाल दास यांनी केला.
रामसेवकपुरम येथे रविवारी दोन ट्रक शिळा आणण्यात आल्या. महंत नृत्यगोपाल दास यांनी त्यांचे पूजन केले, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी दिली. मोदी सरकारकडून मंदिर बांधण्याचे संकेत मिळाले असून, हीच योग्य वेळ आहे, असा दावाही नृत्यगोपाल दास यांनी केला. अयोध्येत अनेक भागातून शिळा येत असून, हे सत्र सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. अयोध्येतील या अचानक सुरू झालेल्या घटनांकडे पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत. शिळा अयोध्येत आलेल्या आहेत आणि त्या खासगी जागेत ठेवल्या आहेत, याला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. मात्र अजून पुढे काही झालेले नाही. मात्र शांतता भंग केला गेला तर कारवाई केली जाईल, असा इशारा फैजाबादचे पोलीस अधीक्षक मोहित गुप्ता यांनी दिला आहे.

सव्वा लाख शिळा दाखल
विश्व हिंदू परिषदेने गेल्या जून महिन्यात राम मंदिर उभारणीची घोषणा केली होती व त्यासाठी शिळा गोळा केल्या जात होत्या. राम मंदिरासाठी २.२५ लाख घनफूट शिळा लागणार असून, विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्या येथील मुख्यालयात १.२५ लाख घनफूट शिळा आणण्यात आल्या आहेत. आणखी १ लाख घनफूट शिळा देशभरातून गोळा केल्या जाणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी तेव्हा दिली होती. गेल्याच महिन्यात गुरगाव येथे सिंघल यांचे निधन झाले.

मंदिर उभारणीस विरोध
अयोध्येतील राममंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर उभारणीस विरोध करू, असे प्रशासनाने म्हटले आहे. अयोध्येत शिळा येऊ देणार नाही तसेच मंदिर बांधू दिले जाणार नाही, असे मुख्य सचिव (गृह) देवाशीष पांडा यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 2:13 am

Web Title: ram mandir silapujana in ayodhya
Next Stories
1 चीनमध्ये दरड कोसळून ४१ जण बेपत्ता
2 अखेर ‘तो’ सुटलाच..
3 जेटली यांची दिल्लीकर खेळाडूंकडून पाठराखण
Just Now!
X