अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत सांगितली. तसेच त्यासाठी ‘श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची घोषणाही केली. मात्र, यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर मतांची शेती करीत असल्याचा आरोप केला आहे.

ओवेसी म्हणाले, संसदेचे अधिवेशन ११ फेब्रुवारी रोजी संपत आहे. तसेच दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे यानंतर ही घोषणा करता येऊ शकली असती. या घोषणेच्या वेळेवरुन असं वाटतंय की भाजपा दिल्लीच्या निवडणुकीवरुन चिंताग्रस्त झाली आहे. त्यांना पराभवाची भीती वाटत आहे.

बाबरी मशीद कशी पाडली हे पुढच्या पिढीला सांगू

ओवेसी म्हणाले, जर सुप्रीम कोर्टाने कार सेवेची परवानगी दिली नसती तर बाबरी मशीद आज पडली नसती. मात्र, बाबरी मशीद कशी पाडली गेली हे आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना सांगणार आहोत. ज्या लोकांनी बाबरी मशिदीचा ढाचा तोडला होता त्यांच्याकडेच मंदिर बनवण्याचे काम देण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी ओवेसी यांनी केला.

आणखी वाचा – राम मंदिराच्या निर्मितीसाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना

भाजपा मतांची शेती करीत आहे – काँग्रेस</strong>

दुसरीकडे यावरुन काँग्रेसने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते मधुसुदन मिस्त्री म्हणाले, पंतप्रधान मोदी मतांची शेती करीत आहेत. त्यासाठी एका विशेष समाजाला टार्गेट करीत वाद निर्माण केले जात आहेत. मात्र, मोदींच्या घोषणेचा कोणताही परिणाम दिल्लीच्या निवडणुकीवर होणार नाही. राम मंदिर हा याआधी निवडणुकीचा मुद्दा होता. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तो संपला आहे. त्यामुळे भाजपा आता सीएए आणि एनआरसीसारखे वाद घेऊन आली आहे.