अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जमीन खरेदी केली. हे जमीन खरेदी प्रकरण वादाचा विषय ठरला आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते कल्याण पांडे यांनी जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली. यावर ट्रस्टने खुलासा केला आहे. मात्र, आता रघुवंश संकल्प सेवा ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी दिलीप दास यांनी रविवारी झालेल्या संतांच्या बैठकीत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर संतांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. रविवारी अयोध्येतील भागवताचार्य सदनात संतांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत रघुवंश संकल्प सेवा ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी दिलीप दास यांनी हा मुद्दा उचलून धरत संताप व्यक्त केला.

हेही वाचा- “दोन कोटींची जमीन दहा मिनिटांत १८ कोटींना कशी घेतली?”; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप

स्वामी दिलीप दास यांनी थेट श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नियतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “ज्या प्रभूरामासोबत हे विश्वासघात करत आहेत, तो राजाराम नाही. तो योद्धा रामही नाही. हा तर बालक राम आहे. अबोध राम आहे. जो बोलूही शकत नाही. पण, ज्यांना या बालकाच्या संगोपनाची जबाबदारी मिळाली, त्याच्याच भूमीवर नियत खराब झाली आहे. त्यामुळे हे लोक या बालकाच्या भविष्यासोबत काय करू शकतात? याचा निर्णय आपण स्वतः करावा,” असं आवाहन दिलीप दास यांनी उपस्थित साधूंना केलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, “महिमा आणि गरिमा यांच्या विरोधात जाऊन काम केलं जात आहे. यात दलाल घुसले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाकडे अशी मागणी करतो की, याची उच्च स्तरीय चौकशी करावी. यांच्यावर कारवाई व्हावी. चौकशीत जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जावी,” असं दिलीप दास यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- राम जन्मभूमी जमीन खरेदी भ्रष्टाचार; ट्रस्टनं आरोप फेटाळले, केला खुलासा…

संतांना एकजूट होण्याचं आवाहन

यावेळी बोलताना स्वामी दिलीप दास यांनी संतांनाही या मुद्द्यावर एकजूट होण्याचं आवाहन केलं. “हे संताचं काम आहे. संत रामाचे दूत आहेत. जर त्या मर्यादा पुरुषोत्तम पित्यासाठी आपण उभे राहिलो नाही, तर हे आपलं दुर्दैव असेल,” असं दिलीप दास म्हणाले. आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञान दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र, यात जमीन खरेदी प्रकरणावर जास्त भर दिला होता.