पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मुद्द्यावरून आता तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात वाद रंगला आहे. हिंदू समाजातील सणांवर आणि रिती रिवाजांवर ममता बॅनर्जी टीका करत आहेत असा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनीही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जशास तसे उत्तर दिले आहे. मुखी रामनाम आणि हाती बंदुक किंवा इतर हत्यारे ही कोणती नीती आहे? असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभू रामचंद्र यांना आपण कधीतरी हाती बंदुक घेतलेले पाहिले आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते रामनवमीच्या दिवशी हाती तलवार आणि बंदुका घेऊन फिरत होते हीच का प्रभू रामचंद्राची शिकवण? असाही प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यात उभा दावा आहे हे तर सगळा देश जाणतो भाजपा असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ममता बॅनर्जी सोडत नाही.

मागील वर्षी पुरुलिया आणि वर्धमान या ठिकाणी हिंसाचाराचे काही प्रसंग घडले होते. त्यानंतरही भाजपा आणि संघाची गुंडगिरी आणि दादागिरी आम्ही सहन करणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी ठणकावले होते. पश्चिम बंगाल सरकारने रामनवमीच्या दिवशी कोणत्याही नव्या संघटनेने रॅली काढू नये असे आदेश काढले होते. फक्त त्याच संघटनांना हत्यारे घेऊन रॅली काढता येईल ज्या संघटना वर्षानुवर्षे अशी रॅली काढत आहेत. बंगालमध्ये रामनवमीचा सण लोकप्रिय नाही तरीही भाजपाकडून या सणाला जास्त महत्त्व दिले जाते आहे असा आरोप तृणमूलच्या काही नेत्यांनी केला होता.

हत्यारे घेऊन जी रॅली काढण्यात आली त्यामुळे पश्चिम बंगालची जनता दहशतीत आहे. ही पश्चिम बंगालची संस्कृती नाही. रामनवमीच्या आधीही हिंसाचाराचे काही प्रसंग घडले. हे कदापि सहन केले जाणार नाही असाही इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला. एवढेच नाही तर पोलीस महासंचालकांनी अशा गुंडांवर कठोर कारवाई करावी असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

सशस्त्र रॅली जर शांतपणे काढण्यात आल्या असत्या तर माझे काहीही म्हणणे नव्हते. मात्र या रॅलींमुळे हिंसाचाराला प्राधान्य मिळते आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही. बंगालमध्ये दुर्गा पूजा, ख्रिसमस यांसारखे सण उत्साहाने आनंदात साजरे केले जातात. यावेळी कोणीही मर्यादा सोडत नाही. रामनवमीच्या उत्सवाच्या नावाखाली जी दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला तो गैर आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

शेख शहाजान या पन्नास वर्षांच्या व्यक्तीचा रॅली दरम्यान मृत्यू झाला. बजरंग दल आणि पोलिसांमध्ये काही कारणामुळे संघर्ष झाला याच दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. या संघर्षादरम्यान शेख शहाजन जखमी झाला त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात एकूण १६ जणांना अटक करण्यात आली. मात्र हे सगळे रामनवमीच्या दिवशी होणे दुर्दैवी आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खडे बोल सुनावले आहेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami violence has ram ever asked anyone to take out rally with weapons asks mamata banerjee
First published on: 26-03-2018 at 18:49 IST