डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र राम रहिमला शिक्षा ठोठावल्यानंतरही त्याच्या अनुयायांची मग्रुरी कायम आहे. डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाच्या माजी अनुयायांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘राम रहिम यांच्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना आम्ही संपवू,’ अशी धमकी ‘कुर्बानी आघाडी’कडून पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’च्या पत्रांमध्ये काही वृत्तवाहिन्यांच्या नावांचा समावेश आहे. केंद्रातील आणि हरयाणातील भाजप सरकारने राम रहिम यांची फसवणूक केल्याचा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. ‘डेरातील किमान २०० मुले राम रहिम यांच्यासाठी प्राणांची बाजी लावायला तयार आहेत. राम रहिम यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्वांना धडा शिकवला जाईल. याचा बदला डेऱ्यातील २०० मुलांकडून घेतला जाईल,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. चंदिगढमध्ये असलेल्या अनेक प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना डेरा सच्चा सौदाकडून टपालाने धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

याआधी डेरा सच्चा सौदाने त्यांच्या मुखपत्रातून अनुयायांना भडकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना, हरयाणा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी डेरा सच्चा सौदाकडून देण्यात आली आहे. या पत्राची सत्यता पडताळून पाहण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. राम रहिम सध्या रोहतकमधील तुरुंगात आहे. तर त्याची मानलेली मुलगी हनीप्रीतचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

२५ ऑगस्टला राम रहिमला बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर पंचकुलासह हरयाणातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उसळला होता. राम रहिमच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान डेरा सच्चा सौदाच्या मालकीच्या संपत्तीतून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी पंचकुलातील एका व्यक्तीने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.