News Flash

राम रहिम सिंगचे भक्त आता ‘जेलभरो’ आंदोलन करण्याच्या तयारीत

गुरमित राम रहिम सिंगला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे

बाबा राम रहिम (संग्रहित छायाचित्र)

बलात्काराच्या प्रकरणात ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमित राम रहिम सिंगला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याच्या भक्तांनी धुडगूस घातला होता. आता हेच भक्त बाबाला मदत करण्यासाठी ‘जेलभरो’ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे आंदोलन नेमके कधी होणार, याबद्दल तूर्त माहिती नाही. तरीही सध्या हरियाणामध्ये काही लोकांच्या वॉट्सअॅप ग्रुपवर या बद्दलचा संदेश फिरताना दिसतो आहे, असे हरियाणा पोलिसांच्या गुप्तचर विभागाने म्हटले आहे.

राम रहिमच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या भक्तांकडून सध्या सोशल मीडिया आणि वॉट्सअॅपवर प्रचार करण्यात येतो आहे. याच प्रचाराचा एक भाग म्हणून जेलभरो आंदोलन करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हरियाणा पोलिसांना वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर त्याचबरोबर वॉट्सअॅप ग्रुपवर या स्वरुपाचे संदेश दिसले आहेत. हे संदेश पाहिल्यानंतर पोलिसांनी अधिक सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर हे संदेश कुठून एकमेकांना पाठवण्यात येत आहेत, त्याचीही माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, कोणत्याही नागरिकाने या स्वरुपाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरमित राम रहिम सिंगला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात त्याला दोषी ठरवल्यानंतर हरियाणा, पंजाबमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या समर्थकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 1:47 pm

Web Title: ram rahim singh fans planning to do jelbharo agitation
Next Stories
1 मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांवर आधारित धडे आता शालेय पाठ्यपुस्तकात!
2 कर्ज फेडा किंवा कंपनी विका; जेटलींचा थकबाकीदार खासगी कंपन्यांना इशारा
3 ब्लू व्हेलचा आणखी एक बळी
Just Now!
X