News Flash

राम रहिमसहित या ‘बाबां’वर लैंगिक शोषणाचे आरोप

लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारे अध्यात्माच्या क्षेत्रातही

संग्रहित छायाचित्र

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना दोन साध्वींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. मात्र भारतातले हे काही पहिले प्रकरण नाही. स्वतःला संत, बाबा म्हणवून घेणारे असे स्वयंघोषित बाबा अनेक आहेत. एवढंच नाही तर यापैकी पाचजण असे आहेत जे प्रसारमाध्यमांद्वारे आणि वाहिन्यांद्वारे घराघरांमध्ये पोहचले आहेत. लैंगिक छळ, बलात्कार, शोषण आणि खुनाचे आरोप या बाबांवर आहेत. जगाने त्यांच्या अध्यात्मिक चेहऱ्यामागची काळी बाजूही पाहिली आहे.

कोण आहेत लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेले बुवा-बाबा?

बाबा राम रहिम
गुरमीत राम रहिम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील दोन साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शुक्रवारीच सीबीआय न्यायालयाने त्यांना दोषी मानले आहे. मात्र बाबा राम रहिम हे दोषी असूच शकत नाहीत असा दावा त्यांच्या अनुयायांनी करत आंदोलन सुरू केले आहे.

आसाराम बापू
विविध वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या सत्संग कार्यक्रमातून घराघरांमध्ये पोहचलेले स्वयंघोषित महाराज म्हणजे आसाराम बापू. नारायण हरिचा जप करणारे हे बापू सध्या अटकेत आहेत.  या आसाराम बापूंवरही १६ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्याच आश्रमात दोन अल्पवयीन मुलंही मृतावस्थेत आढळून आली होती. २००१ ते २००६ या कालावधीत आसाराम बापूंनी माझा लैंगिक छळ केला असा आरोप पीडित मुलीने केला होता.

स्वामी नित्यानंद
स्वयंघोषित भगवान स्वामी नित्यानंद यांच्या सेक्स टेप लीक झाल्या होत्या. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबतच्या या सेक्स टेपनी खळबळ माजवून दिली होती. स्वामी नित्यानंद यांच्या या सेक्स टेप २०१० मध्ये समोर आल्या होत्या. यानंतर झालेल्या कुंभमेळ्यात स्वामी नित्यानंद यांना शाही स्नानात सहभागी होण्यासाठी अलहाबाद आखाडा परिषदेने विरोध दर्शविला होता. २०१० मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

स्वामी भीमानंद
स्वामी भीमानंद याने आपण इच्छाधारी संत असल्याचा दावा करत लोकांचे आजार बरे करण्याचा दावा केला होता. मात्र २०१० मध्ये या स्वामी भीमानंद याचेही नाव सेक्स रॅकेटमध्ये समोर आले होते. रात्र झाली की स्वामी भीमानंद हा भगवी वस्त्रं उतरवून मुलींची दलाली करत असे. अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी या स्वामी भीमानंदला अटक केली.

कृपालू महाराज
कृपालू महाराज यांच्यावर लैंगिक छळ आणि दोन मुलींचे अपहरण केल्याचा आरोप आहे. १० नोव्हेंबर २०१३ रोजी बाथरूममधून पाय घसरून पडल्याने कृपालू महाराज यांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके आरोप होऊनही कृपालू महाराज यांना मानणारा वर्ग आजही जगभरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 8:13 pm

Web Title: ram rahim to aasaram bapu these five self proclaimed babas were involved in sex scandal
Next Stories
1 पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात बीएसएफ जवान गंभीर जखमी
2 सरकारच्या ‘आरक्षण धोरणा’वर संघाच्या भुमिकेचा परिणाम होणार नाही : रामविलास पासवान
3 वैफल्यग्रस्त मॉडेलचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X