डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना सोमवारी रोहतकच्या तुरुंगातच शिक्षा सुनावली जाणार आहे. शुक्रवारी बाबा राम रहिम यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर मोठा हिंसाचार माजला होता. हरयाणातील पंचकुला आणि सिरसा या ठिकाणी एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी हा हिंसाचार माजवला ज्याचे लोण चार राज्यांमध्ये पोहचले आहे. सोमवारी सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सैन्य दल आणि निमलष्करी सैनिक दलाच्या तुकड्याही या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. हरयाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये सैन्य दलाच्या २८ तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच निमलष्करी दलाच्या २३ तुकड्या या दोन्ही राज्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच सोमवारी सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर रोहतक, अंबाला, पंचकुला आणि कैथल येथील शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली आहे. हरयाणातली काही कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.

सोमवारी बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावली जाणार असून या संदर्भात नेमका बंदोबस्त कसा करण्यात येईल याची आखणी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एक बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जेव्हा बाबा राम रहिम यांना दोषी ठरविण्यात आले तेव्हा डेरा सच्चाच्या हजारो कार्यकर्त्यांनी पंचकुला आणि इतर ठिकाणी हिंसाचार माजवला होता. सिरसामध्ये तर संचारबंदी लागू करण्यात आली होती.

आता राम रहिम यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. हरयाणात २९ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजेपर्यंत मोबाईल, इंटरनेट, एसएमएस आणि डोन्गल सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. श्रद्धेच्या नावावर हिंसाचार सहन केला जाणार नाही असा इशारा रविवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी हरयाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.