रामसेतू मानवनिर्मित होता की नैसर्गिक याचा शोध घेण्यासाठी भारतीय इतिहास संशोधन मंडळाने कुठलेही संशोधन करण्याचे ठरवलेले नाही किंवा त्यासाठी निधी देण्याचाही प्रस्ताव नाही असे परिषदेचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांनी सांगितले.

मनुष्यबळ विकास खात्याने रामसेतूचा अभ्यास करण्यासाठी संशोधन प्रकल्पाची घोषणा केली होती त्याबाबत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या मार्चमध्ये इतिहास संशोधन परिषदेने रामसेतू किंवा अ‍ॅडम्स ब्रीज नैसर्गिक की मानवनिर्मित यावर पाण्याखाली संशोधन करण्यासाठी प्रकल्प राबवणार असल्याचे म्हटले होते. त्यावर जामखेडकर यांनी सांगितले की, एका इतिहासकाराने अशा संशोधनाचा प्रस्ताव मांडला होता पण त्याला इतर सदस्यांनी पाठिंबा दिला नाही. आम्ही त्यावर कुठलाही अभ्यास प्रकल्प राबवणार नाही किंवा निधीही देण्याचा विचार नाही. उत्खनन किंवा तत्सम कामे ही इतिहासकारांची नसतात त्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग आहे. यात इतिहास संशोधन परिषद फार तर शिफारस करू शकते. याआधीचे अध्यक्ष वाय. सुदर्शन राव यांनी यात सैद्धांतिक प्रशिक्षण सुरू केले जाईल व नंतर शोध प्रकल्प राबवला जाईल. रामसेतू पथदर्शक प्रकल्प राबवला जाणार असून तो नैसर्गिक होता की मानवनिर्मित हे शोधले जाईल असे राव यांनी त्यावेळी म्हटले होते. भारतीय पुराणशास्त्रानुसार रामसेतू हा भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान असून तो रामाच्या वानरसेनेने श्रीलंकेत जाण्यासाठी बांधला होता.

राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  सांगितले की, रामसेतू प्रकल्प आता रद्द करण्यात आला आहे.  आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले होते पण त्यातच माझा कार्यकाल संपल्याने हा प्रकल्प आता रद्द झाल्यात जमा आहे. यूपीए सरकारने सेतुसमुद्रम प्रकल्पाची आखणी केली होती त्यावेळी रामसेतू त्यातून नष्ट होईल या कारणास्तव काही लोकांनी निषेध केला होता.