देशात करोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला असून, दररोज आढळून येणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. करोनामुळे देशात काहीसं चिंतेच वातावरण असताना भाजपाचे नेते व मध्य प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी एक विधान केलं आहे. “राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर देशातील करोना महामारी संपेल,” असं विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं एएनआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी तयारीही सुरू झाली. राम मंदिराच्या उभारणीची चर्चा सुरू असताना भाजपाचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक वक्तव्य केलं आहे.
“त्यांनी (प्रभू रामचंद्रांनी) मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली करोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल,” असं शर्मा यांनी म्हटलं आहे. “करोनामुळे फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आम्ही केवळ सोशल डिस्टन्सिगच पाळत नाही, तर देवांचं नामस्मरणही करत आहोत. राम मंदिर बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेले आहेत,” असं शर्मा म्हणाले.
असं असणार राम मंदिर
गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 3:13 pm