संघ परिवाराकडून राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर दबाव येत असतानाच आता भाजपाच्या खासदारांनाही सरकारला राम मंदिरावरुन जाब विचारला. राम मंदिराच्या निर्माणासाठी काय पावले उचलली, असा सवाल भाजपा खासदारांनी संसदीय मंडळाच्या बैठकीत विचारला. यामुळे मोदी सरकारची राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपाच्या खासदारांनीच कोंडी केल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.

भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत भाजपाचे खासदार उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित असलेल्या तीन खासदारांनी इंडियन एक्स्प्रेसला नाव न छापण्याच्या अटीवर राम मंदिराच्या मुद्द्यावर नेमके काय घडले, याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीच्या शेवटी सलेमपूरमधील खासदार रविंद्र कुशवाह यांनी राम मंदिराचा मुद्दा मांडला. राम मंदिर बांधण्यासंदर्भात नेमके काय सुरु आहे, असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांमधील खासदारांनीही राम मंदिराचा मुद्दा मांडला. खासदार हरीनारायण राजभर यांनी राम मंदिरासाठी सरकार कायदा आणणार का?, असा सवाल विचारला.

शेवटी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खासदारांना उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी खासदारांना शांत राहण्याचे आणि संयम ठेवा, असे आवाहन केले. ‘राम मंदिर हा सर्वांसाठी भावनिक विषय असून राम मंदिर व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे, सरकारवर विश्वास ठेवा’, असे त्यांनी खासदारांना सांगितले. राम मंदिराबाबत कोणतेही ठोस उत्तर देणे त्यांनी टाळले आणि बैठक आटोपती घेतली. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही उपस्थित नव्हते.

कुशवाह यांनी या मुद्द्यावर इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया देणे टाळले. मी संसदीय मंडळाच्या बैठकीत माझा मुद्दा मांडला, मी काय म्हटलंय हे मी जाहीर करणार नाही, असे त्यांनी सांगितले. तर राजभर यांनी राम मंदिराचा मुद्दा मांडल्याचे मान्य केले. ‘मी बैठकीत राम मंदिराचा मुद्दा मांडला, राम मंदिर कधी बांधणार, यासाठी कायदा कधी आणणार, असा प्रश्न मी विचारला. राम मंदिर हा सर्वांसाठी श्रद्धेचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले.