शिया वक्फ बोर्डाचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख वसिम रिझवी यांनी आज बंगळुरूमध्ये श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. श्री श्री रविशंकर यांना देशातील जनता मानते. ते मध्यस्थी करणार असतील तर राम मंदिर आणि बाबरी मशिद वाद नक्कीच मिटेल, अशी प्रतिक्रिया रिझवी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली.

अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी चर्चेतून तोडगा काढावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या चर्चेसाठी पुढाकार घ्यायला तयार आहे, असे वक्तव्य श्री श्री रविशंकर यांनी दोन दिवसांपू्र्वीच केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर मशिदीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रश्नी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र यावे आणि बसून तोडगा काढावा, अशीही भूमिका मांडली. त्याचमुळे या चर्चेसाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेण्यास सहमती दर्शवली. त्याच पार्श्वभूमीवर वसिम रिझवी यांनी रविशंकर यांची भेट घेतली.

बाबरी आणि राम मंदिर प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी ५ डिसेंबरला होणार आहे. श्री श्री रविशंकर आणि आमच्यात बैठक झालेली नाही. पण ते आमच्याशी बोलू इच्छित असतील तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे मुस्लिम लॉ बोर्डाने स्पष्ट केले. आज शिया वक्फ बोर्डाचे उत्तर प्रदेश प्रमुख रिझवी यांनीही त्यांची भेट घेऊन चर्चेची तयारी दर्शवली.

काय आहे नेमके प्रकरण?
अयोध्येत श्री रामाचा जन्म झाला अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.

१६ व्या शतकात रामाचे मंदिर पाडून बाबरी मशिद बांधण्यात आली असे म्हणणे आहे.

१९९० च्या दशकात भाजपने हा मुद्दा हाती घेतला.

६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली.

या घटनेनंतर हा वाद चिघळला, या प्रश्नी अद्यापही निकाल लागलेला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून बाबरी मशिद आधी की राम मंदिर ? हा वाद अद्यापही मिटलेला नाही. शिया वक्फ बोर्डाने जशी चर्चेची तयारी दाखवली आहे तशी सुन्नी वक्फ बोर्डाने दाखवलेली नाही. तसेच रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य राम विलास वेदांती यांनाही श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी मान्य नाही. त्यामुळे या प्रश्नी काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.