अयोध्येत राम मंदिराची पुनर्बाधणी करण्याबाबतच्या वादग्रस्त पत्राच्या प्रकरणानंतर उत्तर प्रदेश सरकारने प्रधान सचिव (गृह) आर. एम. श्रीवास्तव यांची पदावरून उचलबांगडी केली आहे; तर सर्वेशचंद्र मिश्रा या सचिवांना निलंबित करण्यात आले आहे.
श्रीवास्तव यांच्या जागेवर आता अनिलकुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. श्रीवास्तव यांच्या बदलीचे कोणतेही कारण देण्यात आलेले नसले तरी वादग्रस्त पत्राच्या पाश्र्वभूमीवरच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अयोध्येत राम मंदिराची पुनर्बाधणी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली असल्याचे पत्र गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले. त्यानंतर सत्तारूढ सपाला ती छपाईची चूक असल्याचे सांगत सारवासारव करावी लागली होती. त्याचप्रमाणे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही द्यावे लागले होते.