बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण तापलेले असताना, लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी रविवारी आपल्या पक्ष नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक भाविनक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि केंद्रीयमंत्री रामविलास पासवान हे अतिदक्षता विभाग(आयसीयू)मध्ये दाखल असल्याची माहिती दिली आहे.

या पत्रात चिराग पासवान यांनी वडिलांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा उल्लेख करत भावनिक होत म्हटले आहे की, “आज मी हे पत्र लिहित असताना, वडिलांना रोज आजाराशी लढताना पाहत आहे. एक मुलगा या नात्याने वडिलांना रुग्णालयात पाहून अतिशय अस्वस्थ वाटत आहे.”

बिहार विधानसभा निवडणूक जवळ आलेली असूनही पटणा येथे जाण्यास असमर्थ असल्याचे सांगत, चिराग पासवान यांनी सांगितले की, , “वडिलांनी मला अनेकदा पटणा येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र मुलगा या नात्याने वडिलांना आयसीयूमध्ये सोडून कुठंही जाणं माझ्यासाठी शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. नाहीतर तुमचा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला माफ करू शकणार नाही.”

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मला पक्षाच्या त्या सहकाऱ्यांची देखील चिंता आहे. ज्यांनी आपले जीवन ‘प्रथम बिहार प्रथम बिहीरी’ यासाठी समर्पित केले आहे. याचवेळी त्यांनी पक्ष नेत्यांसह कार्यकर्त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीला घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जागा वाटपाबाबत आतापर्यंत काहीच चर्चा झाली नसल्याचेही सांगितले आहे.