केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे आज निधन झाले. आपल्या मेहनतीने, कष्टाने त्यांनी बिहारच्या राजकारणात स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. रामविलास पासवान यांनी एका छोट्या भागातून येऊन दिल्लीच्या सत्तेपर्यंतचा संघर्ष आपल्या एकट्याच्या जीवावर केला होता. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टीची जबाबदारी त्यांचे पुत्र आणि खासदार चिराग पासवान यांच्यावर सोपवली होती. लोकजनशक्ती पार्टीचे सर्व कामकाज त्यांचे पुत्र आणि खासदार चिराग पासवान संभाळतात. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. रामविलास पासवान यांना आपल्या मुलाला बिहारचे मुख्यमंत्री झालेले पाहायचे होते.

एकदा या विषयावर बोलताना ते म्हणाले होते की, “शंभर टक्के चिरागने बिहारचे मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा आहे. कधी आणि कसे हे घडते, ते पाहू.” “सर्व चिरागवर अवलंबून आहे. अजून दोन वर्ष, पाच वर्ष किंवा भविष्यात घडेल. आज मी भविष्य वर्तवतो, आणखी २० ते २५ वर्षांनी देशातील सर्वोच्च नेत्यांमध्ये चिरागची गणना होईल” असे राम विलास पासवान म्हणाले होते.