News Flash

चंद्राचे झाले दर्शन, देशभरात उद्या रमजान ईद साजरी होणार

मुंबईसह देशभरात आज संध्याकाळी स्पष्टपणे चंद्र दर्शन झाल्याने उद्या ईद साजरी केली जाणार असल्याचे हिलाल सीरत कमिटीने जाहीर केले आहे.

ईदच्या चंद्राचे दर्शन झाल्याने उद्या (बुधवार) देशभरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मुंबईसह देशभरात आज (मंगळवार) संध्याकाळी स्पष्टपणे चंद्र दर्शन झाल्याने उद्या ईद साजरी केली जाणार असल्याचे हिलाल सीरत कमिटीने जाहीर केले आहे. उद्या ईद साजरी केली जाणार असल्याने सर्व मशीदींवर रोषणाई करण्यात आली असून मुस्लिम धर्मियांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासीयांना, मुस्लिम बंधु-भगिनींना तसेच परदेशातील मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर ईदनिमित्त शुभेच्छा संदेश देताना त्यांनी म्हटले की, रमजानच्या पवित्र महिन्याच्या कठोर उपासनेनंतरचा सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे रमजान ईद होय.

औरंगाबादच्या अल-हिलाल कमिटीनेही उद्या बुधवारी ईद उल फित्र सण साजरा केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चंद्र दर्शनाने ६ मे पासून रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली होती. दरम्यान, या पवित्र महिन्यात दररोज रोजे आणि कुराण पठण करण्यात येत होते. तसेच दिवसभर कडक उपवास केल्यानंतर संध्याकाळी इफ्तार केला जात असे. महिनाभराच्या कडक उपासनेनंतर उद्या साजऱ्या होणाऱ्या ईद निमित्त देशभरात उत्साह दिसत असून सर्वत्र मिठाईची दुकानं सजली आहेत.

भारतासह पाकिस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील इतर देशातही उद्याच रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मात्र, सौदी अरेबियात काल चंद्राचे दर्शन झाल्याने आजच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 9:34 pm

Web Title: ramajan eid celebrates nationwide tomorrow
Next Stories
1 पंतप्रधान मोदींना टीएमसी कार्यकर्त्यांनी पाठली दहा हजार पत्र
2 ‘वादग्रस्त विधानं करु नका’; अमित शाहांनी गिरिराज सिंहांना खडसावलं
3 सॅटेलाईटच्या मदतीनं शोधणार IAFचं बेपत्ता विमान
Just Now!
X