भारतीय जनता पक्षाचे नेते रमणसिंह यांनी गुरुवारी सलग तिसऱयांदा छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सलग तिसऱयांदा छत्तीसगढमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले. रमणसिंह यांच्या नेतृत्त्वाखालीच राज्यात भाजपने निवडणूक लढविली होती.
वैद्यकीय व्यवसायसोडून राजकारणात आलेल्या ६१ वर्षांच्या रमणसिंह यांना छत्तीसगढचे राज्यपाल शेखर दत्त यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे उपस्थित होते.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भाजपच्या राजस्थानमधील नेत्या वसुंधरा राजे हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. भाजपचे अन्य नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.