भारतीय क्रिकेट संघाच्या अर्थात टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा करण्याच्या मुद्द्यावरून एकीकडे अबू आझमी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र भगवा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा आहे, भगवा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे असं म्हणत या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

सध्या विश्वचषक स्पर्धा सुरू आहे, या स्पर्धेत खेळणाऱ्या टीम इंडियाच्या जर्सीचा रंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बदलण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप अबू आझमींनी केला. मात्र रामदास आठवले यांनी हा मुद्दा खोडून काढत हा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा तसेच शौर्याचं प्रतीक असलेला रंग आहे असं म्हटलं आहे. तर अबू आझमी यांच्या या आरोपावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून उगाच राजकारण सुरू आहे, आम्ही तिरंग्यात हिरवा रंग नको असे कधी म्हटले आहे का? असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी अबू आझमी यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या जर्सीचा रंग निवडण्याचा अधिकार हा बीसीसीआयकडे होता. बीसीसीआयला जो रंग योग्य वाटला त्यांनी तो दिला. भारतामध्ये भगव्या रंगाची जर्सी तयार करण्यात आली आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी राजकीय नेत्यांमध्ये झडताना दिसत आहेत. अबू आझमी यांनी टीका करताच आता रामदास आठवले यांनी त्यांना उत्तर दिले आहे.