अमित शहा यांच्याशी प्रदेश नेत्यांची दोन तास चर्चा

नवी दिल्ली: राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या निवडीसंदर्भात राज्यातील भाजप नेत्यांनी शुR वारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपनेते अमित शहा यांच्याशी दोन तास चर्चा केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडे विधानसभेत असलेले संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ  शकतात. पण, भाजप तिसरा उमेदवारही उभा करण्याचा विचार करत आहे. तसा निर्णय घेतला गेला तर माजी खासदार-उद्योजकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी प्रदेश भाजपच्या नेत्यांबरोबर उदयनराजे भोसले हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उदयनराजे भाजपमध्ये गेले. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. राज्यातून राज्यसभेवर गेलेल्या सात खासदारांचा कालावधी २ एप्रिलला संपत आहे. त्यात भाजपचे रामदास आठवले आणि अमर साबळे यांचा समावेश आहे.

प्रदेश भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही शहा यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या बरोबर जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे हे देखील होते. महाडिक विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक आहेत. मात्र, शहा यांच्याशी साखर कारखान्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. पुढील आठवडय़ात शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.