लोकसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी पर्याय सुचवला असून तिसऱ्या मुलाला मतदानाचा तसंच सरकारी नोकरीचा हक्क नाकारण्यात यावा असं सांगितलं आहे. रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पुढील ५० वर्षात देशाच्या लोकसंख्येने १५० कोटींचा आकडा ओलांडता कामा नये असंही म्हटलं आहे.

‘हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण कायदेशीरपणे एखाद्या कुटुंबातील दुसऱ्या क्रमांकानंतरच्या मुलांना मतदानाचा हक्क नाकारु. या मुलांना निवडणूक लढण्याचा तसंच सरकारी नोकरीचाही हक्क नाकारला गेला पाहिजे’, असं रामदेव बाबा यांनी सुचवलं आहे.

असा कायदा आणल्यास लोक दोनापेक्षा जास्त मुलांना जन्म देणार नाहीत, मग ते कोणत्याही धर्माचे का असेनात असंही रामदेव बाबांचं म्हणणं आहे. यावेळी रामदेव बाबा यांनी गोहत्येवर पुर्णपणे बंदी आणली पाहिजे असंही सांगितलं. यामुळे गाईंची तस्करी करणारे तसंच गो रक्षकांमध्ये होणारे मतभेद कमी होतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

गोहत्येवर बंदी आणावी अशी मागणी करताना ज्यांना मांसाहार करायचा आहे, त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत असंही त्यांनी सांगितलं. रामदेव बाबा यांनी यावेळई बोलताना देशभरात दारुबंदी आणावी अशी मागणी केली. जर इस्लामिक देशांमध्ये शक्य आहे तर आपल्याकडे का नाही असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.