पतंजलीमुळे देशाच्या घरांघरांमध्ये पोहोचलेले आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची झोप उडवणारे रामदेव बाबा आता लवकरच वस्त्रोद्योग क्षेत्रात उतरणार आहेत. त्यामुळे लवकरच देशभरात रामदेव बाबांकडून कपड्यांची दुकाने सुरु केली जाणार आहेत. विशेष म्हणजे पतंजली समूहाकडून जीन्सचीदेखील विक्री करण्यात येणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून पतंजलीकडून कपड्यांची विक्री केली जाणार आहे. लाईव्ह मिंटने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

लवकरच पतंजली समूहाकडून स्वदेशी कपड्यांची दुकाने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रामदेव बाबा यांचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी दिली आहे. पतंजली समूहाकडून सुरु करण्यात आलेल्या दुकानांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे कपडे विक्रीस उपलब्ध असणार आहेत. कपड्यांच्या व्यवसायातून पहिल्या आर्थिक वर्षात ५ हजार कोटी रुपयांच्या विक्रीचे लक्ष्य पतंजलीकडून निश्चित करण्यात आले आहे. पतंजलीच्या दुकानांमध्ये हातमागाचे, मशीनवर तयार करण्यात आलेले कपडे विक्रीला ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये डेनिमपासून तयार करण्यात आलेल्या कपड्यांचादेखील समावेश असेल.

पतंजली समूहाकडून देशभरात सुरु करण्यात येणाऱ्या कपड्यांच्या दुकानाचे नाव ‘परिधान’ असेल, अशी माहिती एस. के. तिजारावाला यांनी दिली. ‘परिधान’ या नावाने देशभरात पहिल्या टप्प्यात २५० दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. पतंजलीचे कपडे बिग बजारसह देशाच्या अन्य रिटेल आऊटलेट्सवर उपलब्ध असणार आहेत. याशिवाय खादी भवनमध्येदेखील हे कपडे विक्रीस ठेवले जातील.

पतंजलीची उत्पादने खरेदी करण्यात काही अडचणी येत असल्यास घरात बसूनदेखील ऑर्डर करता येऊ शकेल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डर करण्याचे पर्याय पतंजलीने दिले आहेत. यासाठी पतंजलीने या दोन्ही कंपन्यांशी करार केला आहे. पतंजलीच्या सुरुवातीपासून रामदेव बाबा यांनी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इतर वाहिन्यांचा जाहिरातींसाठी आधार घेतला आहे. मात्र आता वेबसाईट्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा विचार पतंजलीकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात पतंजली ऑनलाईन जाहिरातींवर लक्ष केंद्रीत करणार आहे.