News Flash

पतंजलिच्या दुग्ध व्यवसाय प्रमुखाचा करोनामुळे मृत्यू; कंपनी म्हणते, “उपचारांशी संबंध नव्हता, अ‍ॅलोपॅथी ट्रीटमेंट होती सुरु”

२०१८ पासून ते पतंजलिसोबत काम करत होते

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: लिंक्डइन आणि पीटीआयवरुन साभार)

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेड कंपनीतील दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रमुख असणाऱ्या सुनील बन्सल यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कंपनीने सोमवारी यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे. तसेच बन्सल यांच्यावर अ‍ॅलोपॅथी पद्धतीने उपचार सुरु होते आणि त्यामध्ये कंपनीने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचं पतंजलिने स्पष्ट केलं आहे.

बन्सल हे ५७ वर्षाचे होते. पतंजलि आयुर्वेद लिमिटेडच्या दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रमुख असणाऱ्या बन्सल यांचा मृत्यू १९ मे रोजी झाल्याचं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बन्सल हे डेअरी सायन्स विषयाचे तज्ज्ञ होते. २०१८ पासून ते पतंजलि कंपनीसोबत काम करत होते. कंपनीने इतर बड्या कंपन्यांना आव्हान देण्यासाठी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ विकण्यासंदर्भातील घोषणा केली तेव्हा बन्सल यांच्याकडे कंपनीने नेतृत्व सोपवलं होतं. पतंजलिने दही, ताक आणि चीजसारख्या वस्तू बाजारात आणण्याची घोषणा केली होती.

नक्की वाचा >> “लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत, १००० मेलेत… हे कसले डॉक्टर”; रामदेव यांचे आणखीन एक वादग्रस्त विधान

“जयपूरमधील राजस्थान रुग्णालयामध्ये बन्सल यांचं १९ मे रोजी करोनामुळे निधन झालं. त्यांची पत्नी याच रुग्णालयामध्ये राजस्थान सरकारने नियुक्त केलेल्या वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत,” असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर बन्सल यांच्या मृत्यूची चर्चा पुन्हा सुरु झालीय. मात्र रामदेव यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादाचा आणि मृत्यूचा संबंध नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. “त्यांच्यावर अ‍ॅलोपॅथी औषधोपचार सुरु होते. त्यांची पत्नीच यासंदर्भात निर्णय घेत होती. त्यांच्या औषधोपचारांमध्ये पतंजलिची कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती. आम्ही केवळ त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पत्नीच्या संपर्कात होतो,” असं कंपनीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील विधानावरुन वाद

रविवारी रात्री उशीरा बाबा रामदेव यांनी त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील आपलं वादग्रस्त विधान मागे घेतलं होतं. अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं होतं. त्याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं. अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशा विधानां उल्लेख रामदेव यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये होता. रामदेव यांनी हे विधान मागे घेत असल्याचं रविवारी रात्री उशीरा जाहीर केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 9:32 am

Web Title: ramdev dairy exec dies of covid patanjali says he got allopathy care scsg 91
Next Stories
1 मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार?; स्थानिक पोलिसांकडून शोध सुरु
2 “लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत, १००० मेलेत… हे कसले डॉक्टर”; रामदेव यांचे आणखीन एक वादग्रस्त विधान
3 “करोनाची दुसरी लाट चीनमुळे; मोदींनी आव्हान दिल्यामुळेच केला व्हायरल हल्ला”
Just Now!
X