योगगुरू रामदेव बाबा, धार्मिक गुरू श्री श्री रविशंकर, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह इतर शंभरहून अधिक लोकांना यंदा ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारार्थींची नावे प्रसिद्ध केली जातात. मात्र, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पुरस्कारार्थींमध्ये यावेळी कोणाची वर्णी लागणार त्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत.
‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीमध्ये एकूण १४८ जणांचा समावेश असून, त्यामध्ये केवळ दोनच राजकीय व्यक्ती आहेत. राजकीय क्षेत्रातील लालकृष्ण अडवानी आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा यादीमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. प्रसून जोशी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचारासाठी मदत केली होती. अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांचेही नाव या यादीमध्ये आहे.
क्रीडा क्षेत्रातील बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग, बुद्धिबळपटू शशिकिरण कृष्णन, कुस्तीपटू सुशीलकुमार आणि त्याचे प्रशिक्षक सत्पाल आणि माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणाऱया अरूणिमा सिन्हा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, पत्रकार रजत शर्मा, स्वप्न दासगुप्ता, हरीशकंर व्यास आणि अभिनेते प्राण (मरणोत्तर) यांचाही यादीमध्ये समावेश आहे.