महिनाभर रोजे अर्थात उपवास केल्यानंतर शनिवारी म्हणजेच आज देशभरात रमजान ईद साजरी होते आहे. पहाटेच्या नमाज अदा करण्यापासून रमजान ईदचा उत्साह दिसू लागला आहे. आज मुस्लिम बांधव एकमेकांच्या घरी जाऊन गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी चंद्र दिसल्याने शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी चंद्र दर्शन झाल्यावर ईद उल फितर शनिवारी साजरी होणार असल्याची घोषणा केली. आज लहान मुलांना घरातल्या मोठ्या सदस्यांकडून ईदी देण्याचीही प्रथा आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमजान ईद असल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभाव आणि प्रेम वाढीला लागावे यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान ईदच्या मुहूर्तावरच अभिनेता सलमान खानचा रेस-३ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही अनोखी ट्रिट मानली जाते आहे.

रमजानचा महिना हा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना मानला जातो. रमजान हा इस्लाम दिनदर्शिकेतला नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून इसवी सन पूर्व ६२२ मध्ये हिजरी दिनदर्शिका सुरु करण्यात आली. शिरकुर्मा हा खास गोड पदार्थ रमजानच्या निमित्ताने तयार केला जातो. तसेच बिर्याणी, मटण यांसह विविध लज्जतदार पदार्थ आज तयार केले जातात. अत्यंत आनंदात आणि उत्साहात रमजान ईद साजरी केली जाते.

दरम्यान मलाला युसुफजाईनेही ट्विट करून सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या सगळ्या बंधू भगिनींना रमजान ईद निमित्त शुभेच्छा असे ट्विट मलालाने केले आहे. तर ब्रिटिश लायब्ररीने बादशहा अकबराचे एक तैलचित्र ट्विट करत त्या काळात ईद कशी साजरी होते हे सांगितले आहे.