मुस्लिमांसाठी मक्का हे जसं पवित्र स्थान आहे तसंच हिंदूंसाठी अयोध्या हे स्थान आहे. कारण अयोध्या ही रामजन्मभूमी आहे. भगवान श्रीरामाचा जन्म या ठिकाणी झाला आहे. मंदिर-मशीद हा धार्मिक वाद नाही. जमिनीचा वाद आहे, त्याला धार्मिक रंग देण्यात आला आहे असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे. जमिनीच्या वादाला धार्मिक रंग देण्यात आला असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

५ डिसेंबर २०१७ ला अयोध्या प्रकरणात सुनावणी सुरु झाली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हा फक्त जमिनीचा वाद आहे असं म्हटलं होतं. मात्र यावेळी मुस्लिम पक्षकार राजीव धवन यांनी म्हटलं की मुस्लिमांना नमाज अदा करण्याचा अधिकार आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे अशी मागणी केली होती. आता रामजन्मभूमी हे हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे तर मक्का हे मुस्लिमांसाठी पवित्र स्थान आहे असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

दरम्यान मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निर्णय दिला. प्रत्येक निर्णय त्या परिस्थितीरूप घेतलेला असतो असे कोर्टानं स्पष्ट केलं. मशिद हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे का यावर १९९४ साली निकाल देताना फारूखी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं, मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचे स्पष्ट केले होते आणि सरकारनं मशीद ताब्यात घेणं घटनाविरोधी नसल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचेही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दोन विरुद्ध एक अशा मताने हा निर्णय दिला. न्या. अब्दुल नाझीर यांनी फारुखी प्रकरणी शंकास्पद निरीक्षण नोंदवण्यात आल्याचा आक्षेप घेतला. तसेच परिपूर्ण अभ्यास न करता निकाल दिल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवले जावे, असे नाझीर यांनी निकालात म्हटले.सरन्यायाधीश मिश्रा व न्या. भूषण यांनी मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची गरज नसल्याचे सांगत दोन – एक अशा फरकाने निकाल दिला.