News Flash

राम मंदिर भूमिपूजन : २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद शरीफ यांना निमंत्रण

अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण

(मोहम्मद शरीफ यांचं संग्रहित छायाचित्र, सौजन्य - एएनआय )

अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी अर्थात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

“मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आलं आहे. ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे”, असं राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं.

आणखी वाचा- ‘या’ मुहूर्तावर पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन; पाहुण्यांची संख्या १७५

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजन : असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम

मुलाच्या हत्येनंतर बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करायला सुरूवात :-
गेल्या २७ वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास २५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. नातेवाईकांनी त्याचा बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. स्थानिक लोकांमध्ये ते ‘शरीफ चाचा’ नावाने ओळखले जातात. ‘जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत राहणार, कारण या सेवेमुळे मला आनंद मिळतो’, असं शरीफ चाचा म्हणतात.

आणखी वाचा- अयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे?

दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनासाठी करोनाच्या उद्रेकामुळे कमीत कमी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापैकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 10:37 am

Web Title: ramjanmbhoomi trust invites mohammed sharif to attend bhoomi pujan ceremony sas 89
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 कोरिया आणि अयोध्येचं आहे विशेष नातं ; कोरियन राजदूतानेच केला खुलासा
2 राम मंदिर भूमिपूजन : असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम
3 कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना करोनाची लागण
Just Now!
X