भारत-चीन युद्धावेळी आपल्या सैनिकांनी बलिदान दिले आणि डाव्या लोकांनी आनंद साजरा केला, असे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरमेहर कौरच्या वादाबद्दल केल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते सीताराम येचुरी यांनी आरएसएसवर गंभीर आरोप केला. आरएसएस आपले प्रतिगामी विचार देशावर लादण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर कुणी जल्लोष केला होता, असा सवालही त्यांनी केला.

गेल्या आठवड्यात रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. उमर खालीद आणि शेहला रशीद यांच्या भाषणाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अभाविपने विद्यार्थ्यांना आणि महिला पत्रकारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटले होते. लेडी श्रीराम कॉलेजच्या गुरमेहर कौर या तरुणाीने अभाविपविरोधात मोहीम सुरु केली. ‘मी कोणालाही घाबरणार नाही, माझ्या वडीलांनी देशासाठी प्राण दिले होते. मीदेखील देशासाठी बंदुकीच्या गोळ्या खायला तयार आहे’ असे गुरमेहर कौरने म्हटले. केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनीदेखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरमेहर कौरचे नाव न घेता रिजीजू म्हणाले, या तरुणीचं डोकं कोण खराब करतंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर भारत-चीन युद्धावेळी आपल्या सैनिकांनी बलिदान दिले आणि डाव्या लोकांनी आनंद साजरा केला, असे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरमेहर कौरच्या वादाबद्दल केले. त्याला उत्तर देताना येचुरी यांनी आरएसएस आपले प्रतिगामी विचार देशावर लादू पाहात आहेत, असा आरोप केला आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर आरएसएसच्या लोकांनी जल्लोष करून मिठाई वाटली होती, असे येचुरी म्हणाले. कायद्याचे शासन सुनिश्चित करण्यासाठी मंत्री राज्यघटनेची शपथ घेतात आणि त्यानंतर आपला कारभार सुरू करतात. मात्र, सद्यस्थिती पाहिली तर त्यांनी एका वीस वर्षांच्या मुलीला धमकी दिली आणि तिचा अपमानही केला, असे येचुरी यांनी गुरमेहर कौरचा संदर्भ देताना म्हटले. आरएसएस आपल्या विचारधारा देशावर लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.