News Flash

दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटल बिहारी वाजपेयींचे नाव ?

रामलीला मैदान हे असंख्य राजकीय घटनांचे साक्षीदार आहे. २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आले होते.

संग्रहित छायाचित्र

दिल्लीतील रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून ३० ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जायचे. त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले. आता या ऐतिहासिक मैदानाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महानगर पालिकेने तयार केला आहे. महापौर आदेश गुप्ता म्हणाले, अटल बिहारी वाजपेयींनी या मैदानात अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या मैदानाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ३० ऑगस्ट रोजी महासभा होणार असून या महासभेत नामकरणाचा प्रस्ताव मांडला जाईल. सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर मैदानाच्या नामकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

रामलीला मैदान हे असंख्य राजकीय घटनांचे साक्षीदार आहे. २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आले होते. अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा याच मैदानात पार पडला होता. २०१५ मध्ये केजरीवाल हे पुन्हा सत्तेत आले आणि त्यावेळी देखील केजरीवाल सरकारचा शपथविधी सोहळा याच मैदानावर पार पडला.

२०११ मध्ये योगगुरु रामदेव बाबा यांचे भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लोकपालसाठीचे आंदोलनही याच मैदानात झाले होते. १९५२ मध्ये भारतीय जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू- काश्मीरच्या मुद्द्यावरुन याच मैदानात सत्याग्रह केले होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील १९५६- ५७ मध्ये याच मैदानात ऐतिहासिक सभा घेतल्या होत्या. जयप्रकाश नारायण यांनी देखील याच मैदानातून तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकले होते. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. त्याच दिवशी रामलीला मैदानात जयप्रकाश नारायण आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील रॅली घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 11:42 am

Web Title: ramlila maidan renamed after atal bihari vajpayee north delhi municipal corporation proposal
Next Stories
1 सीमेवर लढणाऱ्या भारत – पाकिस्तान सैन्याचा पहिल्यांदाच संयुक्त सराव
2 Onam 2018 : ओणम म्हणजे काय ?
3 दाउदच्या मुलानंतर आता छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर 
Just Now!
X