भारताच्या विविधतेतील एकतेचा नेहमीच उल्लेख करणारे आणि मतभेदाचे स्वर कोलाहलात हरवून जाऊ नयेत याच्या निश्चितीची गरज अधोरेखित करणारे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे आज, (गुरुवारी) ‘रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यान उपक्रमा’चे दुसरे पुष्प गुंफणार आहेत.

एक्स्प्रेस वृत्तसमूहाने गेल्या वर्षी सुरू केलेला हा व्याख्यान उपक्रम समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांना समर्पित करण्यात आलेला आहे. कल्पनांच्या सामर्थ्यांतून जनमत समृद्ध करणे आणि त्याला आकार देणे हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे.

जुलै २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारलेले मुखर्जी यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनाचा चेहरा बदलला आहे. या भवनाची दारे लेखक, कलाकार व संशोधक यांच्यासाठी खुली करतानाच राष्ट्रपतींच्या या प्रासादाचा समृद्ध वारसा भावी पिढीसाठी योग्य प्रकारे जपला जाईल हेही त्यांनी निश्चित केले आहे.

राष्ट्रपतींनी सहिष्णुता जपण्याचे वारंवार आवाहन केले असून, मोकळ्या विचारांसाठी आपल्या खिडक्या खुल्या ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. राज्यघटनेने केलेल्या दिशानिर्देशानुसार त्यांनी देशाच्या विवेकाला मार्गदर्शन केले आहे.

पहिले रामनाथ गोएंका व्याख्यान रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिले होते. ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कायद्याने अनिवार्य केलेल्या आर्थिक मर्यादेचे उल्लंघन करून भारताने अधिक खर्च करावा काय, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना दिलेल्या या व्याख्यानात राजन यांनी अर्थव्यवस्थेसाठी सावधगिरीचा इशारा दिला होता.

समकालीन प्रश्नांवरील चर्चेसाठी..

श्री. रामनाथ गोएंका तसेच एक्स्प्रेस समूहाच्या समाजहितैषी भूमिकेस सुसंगत अशा या व्याख्यान उपक्रमाचा उद्देश आहे तो समकालीन प्रश्नांवरील चर्चेला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांविषयीचे आकलन समृद्ध करण्याचा. त्या अंतर्गत गतवर्षी या उपक्रमात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे ‘इंडिया इन दि ग्लोबल इकॉनॉमी’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यंदाच्या  व्याख्यानात राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांचे अनुभवसंपन्न विचारधन ऐकण्याची संधी जाणकार निमंत्रित श्रोत्यांना मिळणार आहे.