अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कारांचे दिल्लीत वितरण

देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध प्रश्न मांडताना पत्रकारितेचे नवे मानदंड घडवणाऱ्या वार्ताहरांच्या कार्याचा सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गौरव केला जाईल. निमित्त असेल एक्स्प्रेस वृत्तसमूहातर्फे दिल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कारांच्या वितरणाचे.
बॉलीवूड अभिनेता आमीर खानच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्यात २०१३-१४ या वर्षांसाठीचे पुरस्कार वितरित केले जातील. मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमातील उत्कृष्ट वार्ताकनासाठी १५ गटांत पुरस्कार दिले जातील.
यंदाच्या विजेता निवडीच्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. ए. श्रीकृष्ण, एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख, एशियानेट टीव्ही चॅनेलचे संस्थापक आणि एशियन स्कूल ऑफ जर्नालिझमचे अध्यक्ष शशी कुमार, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि पत्रकार व इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या वरिष्ठ फेलो (संशोधक) पोमेला फिलिपोज यांचा समावेश होता.
सर्वच प्रवेशिका उत्कृष्ट दर्जाच्या होत्या. केवळ उच्चभ्रू वर्गाचे प्रश्न न मांडता देशातील कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आणि खऱ्या पत्रकारितेचे दर्शन घडवणाऱ्या होत्या. त्यातून सवरेत्कृष्ट वार्ताकनांची निवड करणे खरोखरच आव्हानात्मक होते, असे मत बहुतेक परीक्षकांनी मांडले.