व्यंकय्या नायडू यांची प्रमुख उपस्थिती

देशातील निवडक उत्कृष्ट पत्रकारांचा येत्या बुधवारी, २० डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणाऱ्या समारंभात रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड््स २०१७ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

भारतीय पत्रकारितेतील हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २००६ साली या पुरस्कारांची सुरुवात केली गेली. गेली कित्येक वर्षे या पुरस्कारांच्या माध्यमातून पत्रकारितेतील उत्कृष्ट गुणांचा सन्मान केला गेला आहे. पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी नेहमीच राजकीय आणि आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून समाजाचा पत्रकारितेवरील विश्वास वृद्धिंगत केला आहे.

यंदाही या पुरस्कारासाठी विविध विषयांवर झालेल्या वृत्तांकनांबद्दल देशभरातून ८०० हून अधिक अर्ज आले होते. त्यात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये उळलेल्या हिंसाचारापासून बँकाकडून कोटय़वधींची बुडित कर्जे रद्द केली जाणे, विणकरांच्या अडचणी मांडणाऱ्या कथा आणि स्वतंत्र घरांसंबंधी सत्यकथा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. एकापेक्षा एक सरस अशा या वृत्तकथांमधून विजेत्यांची निवड करण्याचे कठीण काम पार पाडले ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, एचडीएफसी लि.चे अध्यक्ष दीपक पारेख, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि वरिष्ठ पत्रकार पामेला फिलिपोज यांसारख्या नावाजलेल्या परीक्षकांनी. या सर्व अर्जामधून २५ गटांतील विजेत्यांची निवड करण्यात आली असून नवी दिल्लीत २० डिसेंबरला होणाऱ्या समारंभात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना परितोषिके प्रदान केली जातील. नायडू कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

सध्याच्या काळात आपल्याला स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या पत्रकारांची गरज आहे. आजच्या ज्वलंत प्रश्नांवर स्वतंत्रपणे विचार करून लिखाण करणारे तरुण पत्रकार घडवणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे या माझ्या मते या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. पत्रकारितेत मन आणि बुद्धी परत आणण्याचा हा काळ आहे, ज्यायोगे सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची अंधपणे री ओढण्याची गरज उरणार नाही, असे फिलिपोज यांनी म्हटले. या प्रक्रियेत ज्यांनी वेगळे काहीतरी पाहण्याचा, लपलेले सत्य शोधण्याचा आणि ते खणून काढण्याचा अधिक प्रयत्न केला त्याचा मागोवा घेताना मला उत्तेजना जाणवली, असेही त्या म्हणाल्या.

सर्वात मानाच्या या पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करणे हे कायमच कठीण काम आहे. एकापेक्षा एक सुरस अशा कित्येक वृत्तकथा आणि वृत्तांत होते. या निवडप्रक्रियेत सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो, असे एस. वाय. कुरेशी म्हणाले.