25 October 2020

News Flash

रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे सोमवारी वितरण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत २० जानेवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकींचे उच्च प्रतीची व्यावसायिक मूल्ये जपून वार्ताकन करणाऱ्या मुद्रण, प्रक्षेपण आणि डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांना पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत २० जानेवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. यंदा २५ लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून मुद्रण, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. व्यापारी, आर्थिक, क्रीडा, राजकीय वार्ताकन, चित्रपट आणि दूरदर्शन पत्रकारिता, नागरी पत्रकारिता, पर्यावरणविषयक वार्ताकन, युद्धभूमीवरील पत्रकारिता आणि प्रादेशिक भाषेतील वार्ताकन आदी वर्गवारींचा त्यात समावेश आहे.

जिंदाल स्कूल ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, ओ. पी. जिंदाल विद्यापीठाचे टॉम गोल्डसेइन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या पत्रकार पामेला फिलिपोस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण या मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

‘‘प्रत्येक वर्षांप्रमाणे यंदाही विजेत्यांची निवड करणे हे कठीण काम होते. यासाठी आलेल्या अर्जदारांचा दर्जा उच्च प्रतीचा होता, तो विलक्षण अनुभव होता’’, असे एस. वाय. कुरेशी म्हणाले. या पत्रकारिता पुरस्कारांसाठी आलेल्या उत्तम अर्जाचा दर्जा हा आपण अमेरिकेमध्ये केलेल्या कामाच्या धर्तीवरील होता, असे गोल्डस्टेइन यांनी म्हटले आहे. गोल्डस्टेइन यांनी कोलंबिया आणि बर्कले येथील पत्रकारिता महाविद्यालयांत अधिष्ठाता म्हणूनही काम केले आहे.

‘‘वृत्त वार्ताकनामध्ये एक्स्प्रेस अग्रेसर आहे. या पुरस्कारांमुळे सर्वोत्तम कामावर प्रकाशझोत टाकण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात ते यशस्वी होणार आहेत’’, असे फिलिपोस यांनी म्हटले आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये पहिल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले होते. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे  होते आणि त्यांच्या हस्ते १८ वर्गवारीतील २९ विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

यंदाचे नावीन्य, विद्यार्थ्यांचीही दखल

या पुरस्कारांच्या निवड समितीच्या सदस्य आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्चच्या पत्रकार पामेला फिलिपोस म्हणाल्या की, नव्या संकल्पना आणि कल बातम्यांमधून उलगडण्यात आले हे यंदाच्या अर्जाचे वैशिष्टय़ आहे. जगाकडे आपण अधिक परिपूर्णतेने कसे पाहतो ते बातम्यांमधून प्रतिबिंबित होत आहे. विद्यार्थ्यांच्या मासिकांसाठी पुरस्कार हे यंदाचे नावीन्य आहे, त्यामुळे तळागाळापासून पत्रकारितेला प्रोत्साहन मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:56 am

Web Title: ramnath goenka journalism awards akp 94
Next Stories
1 नड्डा हेच भाजपचे नवे अध्यक्ष?
2 दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी‘आप’ उमेदवारांची यादी जाहीर
3 आरोपींना फाशीच!
Just Now!
X