येस बँक घोटाळा : बनावट कंपन्यांतून दोन हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध लादल्यामुळे अडचणीत आलेल्या ‘येस बँके’चे सहसंस्थापक राणा कपूर यांना रविवारी पहाटे सक्तवसुली महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली.

कपूर यांना विशेष न्यायालयाने ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या निवासस्थानावरील छाप्यात विविध बनावट कंपन्यांमध्ये दोन हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचे महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले.

कपूर यांच्या वरळी येथील निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांनुसार कपूर कुटुंबीयांची लंडन येथे मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या मालमत्तेचा स्रोत मिळू न शकल्याने त्यांना शुक्रवारी व शनिवारी सक्तवसुली महासंचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. कपूर यांनी चौकशीत सहकार्य न केल्याने अखेर त्यांना रविवारी पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. सकाळी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कपूर यांच्या घरात अत्यंत महागडी अशी ४४ चित्रे सापडली आहेत. यापैकी काही चित्रे राजकारणी मंडळींकडून विकत घेतल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणीही त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला, असे महासंचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

बिंदू कपूर तसेच तिन्ही मुलींच्या नावे असलेल्या कंपन्यांमध्ये ६०० कोटींहून अधिक गुंतवणूक आर्थिक घोटाळ्यातील दिवाण हौसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) या कंपनीकडून आल्याचे स्पष्ट झाल्याने सक्तवसुली महासंचालनालयाकडून अधिक चौकशी सुरू होती. कपूर यांच्या मुलींच्या दिल्ली येथील निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्येही काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. ‘डीएचएफएल’ या कंपनीला दिलेल्या तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर कपूर कुटुंबीयांचा संबंध असलेल्या डूइट अर्बन व्हेन्चर (इंडिया) प्रा. लि. या कंपनीत ६०० कोटी जमा झाले. ‘डीएचएफएल’ला दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने काहीच केले नाही. त्याचसाठी कपूर कुटुंबीयांशी संबंधित कंपनीला लाच दिली गेली असावी, असा महासंचालनायाचा संशय आहे. या दिशेने याआधीच चौकशी सुरू असून आता महासंचालनालयाकडून कपूर यांची चौकशी करण्यात येणार आहे. ‘डूइट अर्बन व्हेन्चर’ ही कंपनी त्यांच्या मुली राधा व रोशनी कपूर यांच्या आहेत. त्यांना डीएचएफएलने ६०० कोटी कर्ज दिले आहे, असा दावा राणा कपूर यांनी विशेष न्यायालयातही केला, मात्र या आर्थिक घोटाळ्यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कपूर यांची कसून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे महासंचालनालयाने न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले.

कन्या रोशनी कपूरला विमानतळावर रोखले

राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर ही ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने रविवारी लंडनला निघाली असताना तिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले. तिच्याविरुद्ध नोटीस जारी असल्यामुळे तिला माघारी परतावे लागले. राणा कपूर यांच्या अटकेनंतर पत्नी बिंदू तसेच अन्य दोन मुली राखी कपूर-टंडन तसेच राधा कपूर यांच्याविरुद्ध सक्तवसुली महासंचालनालयाने नोटीस जारी केली आहे. त्यामुळे कपूर कुटुंबीयांना आता भारताबाहेर जाण्यावर र्निबध आले आहेत.

कुटुंबियांचा जबाब; विकासकाची चौकशी?

  • कपूर यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी बिंदू तसेच तीन मुलींचा जबाब नोंदविण्यास महासंचालनालयाने सुरुवात केली आहे.
  • या प्रकरणी एका बडय़ा विकासकाचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • कपूर कुटुंबीयांशी संबंधित बनावट कंपन्यांमध्ये या विकासकाच्या कंपन्यांतून कोटय़वधी रुपये वळविण्यात आले आहेत.
  • कर्जाच्या मोबदल्यात ही लाच घेतली असावी, असा महासंचालनालयाचा दावा आहे.