20 November 2019

News Flash

जातीय पोस्ट करणाऱ्या तरुणीला धडा, न्यायालयाने दिली कुराणचं वाटप करण्याची शिक्षा

भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल तरुणीला अटक करण्यात आली होती

रांची न्यायालायने सोशल मीडियावर जातीय टिप्पणी करणारी पोस्ट करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ कुराणचं वाटप करण्याची शिक्षा दिली आहे. न्यायाधीश मनिष कुमार यांनी रिचा भारती या तरुणीला एक प्रत अंजुमन इस्लामिया समितीला तर उर्वरित चार प्रती शाळा आणि कॉलेजमधील ग्रंथालयात देण्याचा आदेश दिला आहे.

रिचा भारती कॉलेज विद्यार्थिनी असून पहिल्या वर्षात शिकत आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर स्थानिकांमध्ये रोष पसरला होता. काही हिंदू संघटनांनी सुटकेसाठी निदर्शनही केलं होतं. ग्रामीण पोलीस अधिक्षक आशुतोष शेखर यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झालं होतं.

दोन्ही समुदायांनी संमती दर्शवल्यानंतर न्यायालयाने रिचा भारतीला जामीन मंजूर केला. रिचा भारतीच्या वकिलांनी १५ दिवसांत आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हिंदू संघटना आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

First Published on July 16, 2019 4:53 pm

Web Title: ranchi court muslim holy book quran communal remarks sgy 87
Just Now!
X