सिंधुदुर्ग-गोवा मार्गावरील धारगळ टोलनाक्यावर केलेल्या मारहाणीप्रकरणी अटक झालेले स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्या सुटकेसाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आर्जव करावे लागले. मनोहर पर्रिकर यांनीच बुधवारी ही माहिती दिली.
धारगळ टोलनाक्यावर टोल देण्यावरून नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. गोवा पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. या प्रकारानंतर नारायण राणे यांनी तातडीने गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांना दूरध्वनी करून नीतेश यांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे विनंती केली. नीतेशच्या प्रकरणात आपण लक्ष घालावे व शक्य असेल तर त्यास सोडून द्यावे अशी विनंती करणारा दूरध्वनी राणे यांनी आपल्याला केल्याची माहिती पर्रिकर यांनी बुधवारी येथे दिली. दूरध्वनीवरून बोलताना राणे यांनी कोणताही त्रागा व्यक्त न केल्याचे पर्रिकर यांनी आवर्जून नमूद केले.
जामिनावर सुटका
दरम्यान, नीतेश यांच्यासह तिघांना बुधवारी जामिनावर सोडण्यात आले. म्हापसा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांना हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.