सरन्यायाधीशांवरील आरोपांचे प्रकरण

सर्वोच्च न्यायालयातील माजी महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या अंतर्गत समितीचे प्रमुख न्या. शरद बोबडे यांची न्या. आर. एफ.नरिमन व धनंजय चंद्रचूड यांनी  भेट घेतल्याच्या प्रसारमाध्यमातील बातम्या चुकीच्या असल्याचे रविवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दोन न्यायाधीश शुक्रवारी सायंकाळी न्या. बोबडे यांना भेटल्याचे वृत्त दिले आहे. सरन्यायाधीशांवरील आरोपाबाबत चौकशी करणाऱ्या अंतर्गत समितीने त्यांच्याकडे आलेल्या माहितीवर चौकशी सुरू केली असून त्यात इतर न्यायाधीशांकडून आलेल्या माहितीचा काही संबंध नाही. न्या. नरिमन व न्या.चंद्रचूड यांनी समितीचे प्रमुख न्या. बोबडे यांची भेट घेतल्याची माहिती खरी नाही. या समितीने एकतर्फी माहितीवर विसंबून पुढे जाऊ नये, असे न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी तीन सदस्यीय समितीची भेट घेऊन सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. माजी महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप केले असून त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हताच वादात आली आहे. सदर तक्रारदार महिलेने या समितीसमोर पहिले काही दिवस उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा उपस्थित राहण्यास नकार दिल्यानंतर एकतर्फी निकाल देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. न्या. बोबडे यांनी वृत्तसंस्थेला असे सांगितले होते, की ही अंतर्गत प्रक्रिया असून त्यात सदर महिलेस वकिलाची मदत घेता येणार नाही, कारण ही न्यायालयीन सुनावणी नाही तर अंतर्गत चौकशी आहे. अंतर्गत समितीने न्यायमित्र म्हणून एका वकिलाची नेमणूक करावी, अशी सूचना न्या. बोबडे यांची भेट घेणाऱ्या दोन न्यायाधीशांनी केल्याचे सदर वृत्तपत्राने म्हटले होते. या अंतर्गत चौकशी समितीत. न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे.  ३ मे रोजी सायंकाळी न्या. नरिमन व चंद्रचूड यांनी न्या. बोबडे यांची भेट घेतल्याची बातमी संबंधित वृत्तपत्राने दिली होती.