पाकिस्तानमध्ये बलात्काराची एक घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बलात्कार केलेल्या आरोपीला माफी मिळावी यासाठी पीडित तरुणीच्या भावाला आरोपीच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा अजब फर्मान काढल्याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे.

डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने २० मार्चला महिलेवर बलात्कार केला होता. यानंतर आरोपीच्या कुटुंबियांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची माफी मागितली. विशेष म्हणजे पीडित तरुणीचे कुटुंबिय आरोपीला माफ करण्यास तयारही झालं होतं, पण त्यांनी एक अट ठेवली. या अटीनुसार, पीडित तरुणीचा भाऊ आरोपीच्या बहिणीसोबत तेच कृत्य करणार जे त्याच्या बहिणीसोबत झालं. धक्कादायक म्हणजे आरोपीचं कुटुंबिय यासाठी तयारही झालं.

रिपोर्टनुसार, पीडित तरुणीच्या भावाने २१ मार्चला आरोपीच्या बहिणीसोबत बलात्कार केला. हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा एका पोलीस अधिका-याने पाहिलं की, दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल न करण्यावर सहमती दर्शवली आहे. पोलीस अधिका-याने आपल्या वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती दिली, ज्यानंतर आरोपीच्या बहिणीसहित १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांतात बदला घेण्याच्या भावनेतून बलात्कार झाल्याची ही दुसरी घटना आहे. गतवर्षी जुलै महिन्यात एका गावातील पंचायतने १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्काराची परवानगी दिली होती, कारण तिच्या भावाने एका १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. हा बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबिय आणि ४० सदस्यांसमोर झाला होता.