हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी आपण निर्दोष असून आपल्याला यात अकारण गोवण्यात आले आहे, अशा आशयाचे पत्र या प्रकरणातील ४ आरोपींनी पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे.

या आरोपींना सध्या ठेवण्यात आलेल्या अलीगड जिल्हा न्यायालयातून त्यांनी पाठवलेले पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

आपली कथित बलात्कार पीडितेशी मैत्री होती. त्यामुळे या १९ वर्षांच्या दलित युवतीची आई व भाऊ यांनी तिला मारहाण केली आणि यात गंभीर जखमा होऊन ती मरण पावली, असेही मुख्य आरोपी संदीप याने या पत्रात म्हटले आहे.

हाथरसचे पोलीस अधीक्षक विनित जैस्वाल यांनी आरोपींकडून पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या पत्रावर कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.

या प्रकरणातील संदीप, लवकुश, रवी व रामू ऊर्फ रामकुमार या ४ आरोपींची नावे व अंगठय़ाचे ठसे पत्रात असून, मुख्य आरोपी संदीपच्या वतीने ते लिहिण्यात आले आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा करतानाच, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी म्हटले आहे.

तपास ‘सीबीआय’कडे वर्ग करण्याची मागणी

हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यापूर्वी राज्य सरकारने धमकी दिलेल्या पीडितांसमवेत काम करण्याचा अनुभव असल्याचे या स्वयंसेवी संस्थेने म्हटले असून हाथरस घटनेबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयास सहकार्य करण्याची तयारीही दर्शविली आहे.

‘सिटिझन्स फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’ या अर्जदार संस्थेने साक्षीदारांचे संरक्षण, मृतांचे हक्क, नार्को चाचणी, न्यायवैद्यक अहवाल आदी काही मुद्दे आपल्या अर्जात मांडले आहेत. काही ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या घृणास्पद कृत्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यानंतर स्वयंसेवी संस्थेने त्यामध्ये प्रामुख्याने हस्तक्षेप केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारनेही या आठवडय़ात खटल्याबाबत  प्रतिज्ञापत्र सादर केले असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली मध्यवर्ती यंत्रणेला तपास करण्याचे आदेश द्यावे, असेही उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.

पीडितेची भाजपकडून बदनामी – प्रियंका

* हाथरस पीडितेची बदनामी करणारी माहिती भाजप पसरवत असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला. पीडित महिला न्यायास पात्र आहे, निंदेस नाही, असेही प्रियंका गांधी-वढेरा यांनी म्हटले आहे.

* ज्या महिलेविरुद्ध गुन्हा घडला त्या महिलेलाच त्यासाठी जबाबदार धरण्याचा खटाटोप उत्तर प्रदेशातील सत्तारूढ पक्ष करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. महिलेच्या चारित्र्याची बदनामी करणारी माहिती पसरविणे आणि गुन्ह्य़ासाठी तिलाच जबाबदार धरणे हा प्रकार किळसवाणा आणि प्रतिगामी आहे, असे गांधी-वढेरा यांनी ट्वीट केले आहे. भाजपवर आरोप करताना गांधी-वढेरा यांनी ‘शेमलेस’ असे हॅशटॅग केले आहे.