राजधानी दिल्लीत एका चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराचे पडसाद मंगळवारी संसदेतही उमटले. सर्वच खासदारांनी या रानटी कृत्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत या प्रकरणी दोषी असलेल्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे अनेक मुद्दयांवर सातत्याने एकमेकांना विरोध करणारे सर्वपक्षीय खासदार या मुद्दयावर मात्र खांद्याला खांदा लावून उभे राहिले. विशेष म्हणजे दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असूनही काँग्रेससह सर्वच पक्षांच्या खासदारांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आतापर्यंत अनेक मुद्दयांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मंगळवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच दोन्ही सभागृहांतील महिला खासदारांनी आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील त्या भयानक प्रसंगाला संसदेत वाचा फोडली. राज्यसभेत या प्रसंगाबाबत सर्वप्रथम त्वेषाने आपली भूमिका मांडताना सिने अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना आपले अश्रू आवरले नाहीत. दोन्ही सभागृहांत चर्चिल्या गेलेल्या या विदारक प्रसंगाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन अखेर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.
लोकसभेचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी यांनी रविवारच्या प्रसंगाबाबत खेद व्यक्त केला. हा प्रसंग सर्वच समाजासाठी शरमेचा आहे. सरकारने या प्रकरणाची दखल त्वरीत घ्यावी, असेही त्यांनी सरकारला सूचित केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांना मृत्युदंड द्यावा, अशी ठोस मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. मात्र यामुळे बलात्कारानंतर तरुणींचे खून पाडण्याचे प्रकार सर्रास वाढतील, असे सांगत काँग्रेस खासदार गिरीजा व्यास यांनी त्याला विरोध दर्शवला. मात्र स्वराज यांच्या या मागणीला इतर सर्वच पक्षांतील खासदारांचा पाठिंबा मिळाला.
राज्यसभेतही सदस्यांनी या प्रकरणी निषेध व्यक्त केला. हे प्रकरण दुपारच्या सत्रात घेतले जाईल आणि सरकार त्यावर उत्तर देईल असे सभापती हमीद अन्सारी यांनी सांगताच विरोधी पक्षातील सदस्यांनी त्याला नकार दिला. तसेच गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत उत्तर द्यावे, अशीही मागणी केली. प्रश्नोत्तरांच्या तासाला सभापतींनी नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न पटलावर घेतल्यावर जया बच्चन यांनी उभे राहत निषेध केला. राजकीय प्रकरणांची चर्चा घडवून आणण्यासाठी प्रश्नोत्तरांचा तास निलंबित केला जातो. तर स्त्रियांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी असे का होऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पक्षातील सदस्य तसेच इतर पक्षांतील महिला सदस्यही उभ्या राहिल्या.
दिल्लीतील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अभय आहे, तोपर्यंत दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था सुधारणार नाही, असा घणाघाती आरोप भाजपचे राम जेठमलानी यांनी केला. आपला रोख दिल्लीच्या पोलीस आयुक्तांवर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्या या मागणीला सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.