बलात्कार हा समाजाविरोधातील गुन्हा असल्याचे निरीक्षण नोंदवत पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने मंगळवारी बलात्कार प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळून लावली. आरोप करणाऱ्या मुलीसोबत तडजोडीस तयार असल्याने गुन्हा रद्द करावा, अशी मागणी आरोपीने केली होती.

जिंदमधील महिलेने २०१६ मध्ये तिच्या दिराविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. पीडित महिला व तिच्या बहिणीने जिंदमधील दोघा भावांशी लग्न केले होते. यातील बहिणीच्या पतीने माझ्यावर बलात्कार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. पती आणि सासरच्या मंडळींनी या घटनेची बाहेर वाच्यता करु नको, यासाठी धमकावल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता.

घटनेनंतर दोन्ही बहिणींनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. वैवाहिक वादांमधून बलात्काराची तक्रार दाखल केल्याचे पीडितेने २०१७ मध्ये हायकोर्टात सांगितले. यानंतर हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयात जाऊन पुन्हा एकदा जबाब नोंदवावा, असे आदेश दिले होते. यानुसार जबाब घेतल्यानंतर कनिष्ठ न्यायालयातील न्यायमूर्तींनी हायकोर्टाला अहवाल पाठवला होता. यात दोन्ही पक्षकारांनी तडजोडीची भूमिका घेतल्याचे म्हटले होते. यावर हायकोर्टाने नुकताच निकाल दिला. ‘अनेकदा तडजोडीनंतर बलात्काराचे गुन्हे मागे घेतले जातात. पण हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. हा समाजाविरोधातील गुन्हा असून यातील आरोपीला तडजोडीच्या आधारे मुक्त करता येणार नाही, असे हायकोर्टाने नमूद करत आरोपीची याचिका फेटाळून लावली.