बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यामुळे उत्तर प्रदेशात इयत्ता दहावीत शिकणाऱया एका मुलीने गुरुवारी आपल्या नातेवाईकांच्या घरात आत्महत्या केली. गाझियाबादमधील फरीदनगर भागामध्ये घरातील सीलिंग फॅनच्या साह्याने गळफास घेऊन संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मसुरीमध्ये राहणाऱया संबंधित मुलीवर दोन जुलैरोजी धर्मेंद्र नावाच्या तरुणाने बलात्कार केला होता. धर्मेंद्रने आपल्या दोन मित्रांसह संबंधित तरुणीचे अपहरण करून तिला अज्ञातस्थळी नेले. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयाने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर संबंधित तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार मागे घेण्यासाठी मुलीसह तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. दबावापासून मुलीला दूर ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला आपल्या नातेवाईकांच्या घरी फरीदनगरमध्ये ठेवले. धर्मेंद्र आणि त्याच्या नातेवाईकांनी तिथेही जाऊन तिला धमकावल्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला.
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्य़ात आला असून, पोलिस धर्मेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी करीत आहेत.