काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर एका २४ वर्षीय महिलेने आपल्या मित्रासह स्वतःला पेटवून घेतलं होतं. या महिलेचा आता मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर तिच्यासोबतच्या तरुणाचा या आधीच म्हणजे शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

ही महिला उत्तरप्रदेशातल्या गाझिपूर जिल्ह्यातली विद्यार्थिनी होती. ती १६ ऑगस्टला आपल्या मित्रासोबत दिल्लीमध्ये आली होती. या दोघांनीही एकमेकांना पेटवून घेण्याआधी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमध्ये तिने बसपा खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याचबरोबर उत्तरप्रदेश पोलीस आणि न्यायाधीशही या प्रकारात सामील असल्याचा गंभीर आरोप तिने केला होता.

तिच्या पालकांनी या प्रकरणात इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, तिने आम्हाला या प्रकाराबद्दल काहीच सांगितलं नाही. आम्हाला तर ती दिल्लीला कधी गेली हेही माहित नव्हतं. आम्हाला तिला मदत करायची होती पण ती म्हणाली की मी सगळं सांभाळून घेते. हा खासदार आणि त्याचे कार्यकर्ते तिला २०१९ पासून त्रास देत होते. त्यांना असं वाटत होतं की आम्ही तक्रार मागे घ्यावी. पण आम्ही घेतली नाही. त्यांच्याकडे काही व्हिडिओही होते, जे दाखवून ते आम्हाला धमकी देत होते. मात्र आमची मुलगी म्हणाली की काहीही असलं तरी आपण लढूयात.

हेही वाचा -धक्कादायक! सर्वोच्च न्यायालयासमोर माहिला आणि पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न

या महिलेचे वडील म्हणाले, माझी मुलगी कधीच फरार नव्हती. पण तरीही पोलिसांनी तिच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करत वॉरंटही जारी केलं. ती खूप नाराज होती. सरकारने या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. माझ्या मुलीला सतत छळलं गेला, त्रास दिला गेला.

या तरुणीवर बसपचे खासदार राय यांनी जून २०१९ मध्ये बलात्कार केल्याची तिची तक्रार होती. त्यावेळी ती त्यांच्या घरी गेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तसेच राय यांना तुरुंगातही जावे लागले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला खोटय़ा प्रकरणात गोवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला, असे या तरुणीचे म्हणणे होते. आता या प्रकरणात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी  तपास सुरू केला असला तरी तेही तरुणी आणि तरुणाचा जाबजबाब मात्र नोंदवू शकले नाहीत.