News Flash

मोठा निर्णय! आता घरातच करु शकता करोना चाचणी; पुण्यातील कंपनीच्या टेस्ट किटला मान्यता

आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत

संग्रहित (Reuters)

करोना चाचणी करण्यासाठी आता रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातही रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने करोना चाचणी करु शकता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) घरच्या घरी करोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत.

आयसीएमआरने निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणं आहेत तसंच जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

“पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रत्येकाला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. लक्षंण नसणारे जे रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

आयसीएमआरकडून पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीच्या रॅपिड अँटिजन टेस्ट किटला मान्यता देण्यात आली आहे. मायलॅबने The CoviSelfTM (PathoCatch) COVID-19 OTC Antigen LF device ची निर्मिती केली आहे. घरी चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. या अॅपमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच चाचणी करता येईल.

“चाचणी प्रक्रियेसाठी मोबाइल अॅप विस्तृतपणे माहिती देईल आणि रुग्ण निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याचा निकाल देईल. सर्व युजर्सनी अॅप डाऊनलोड केलं आहे त्याच मोबाइलवरुन चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो काढावा,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे. फोनमधील डाटा हा आयसीएमआरच्या कोविड टेस्टिंग पोर्टलसोबत जोडल्या गेलेल्या सुरक्षित सर्वरमध्ये साठवला जाईल.

आयसीएमआरने यावेळी रुग्णांना गोपनीयता राखली जाईल असं आश्वासान दिलं आहे. होम टेस्ट किटमुळे प्रयोगशाळांवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांत २० लाख ८ हजार २९६ नमुने घेत नवा रेकॉर्ड करण्यात आला आहे. मात्र आकडे पाहिले असता देशात सध्या पूर्ण क्षमतेने चाचण्या होत नसल्याचं समो येतं. दिवसाला ३३ लाख चाचण्यांची क्षमता असताना देशात सरासरी १८ लाख चाचण्या होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 7:46 am

Web Title: rapid antigen kits to conduct covid test at home got a green signal from icmr sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष थांबवण्यासाठी बायडेन यांचा दबाव
2 पवार यांच्या मागणीनंतर खतांच्या किंमती पूर्ववत
3 ‘सिंगापूर’वरून केंद्र-‘आप’मध्ये खडाजंगी
Just Now!
X