पंतप्रधान मोदी यांचा सतर्कतेचा इशारा

ग्रामीण भागातही करोनाचा अतिवेगाने फैलाव होत असल्याचे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकरी आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला. देशातील शेतकरी आणि खेड्यांमधील नागरिकांना आपण पुन्हा एकदा करोनाच्या प्रादुर्भावाबद्दल दक्षता बाळगण्याचा इशारा देत आहोत. आता खेड्यांमध्येही विषाणू फैलाव झपाट्याने होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे २० हजार कोटींहून अधिक रकमेचा आठवा हप्ता वितरित केला. त्याचा ९.५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव देशाच्या ग्रामीण भागांमध्ये वेगाने होत आहे, त्यामुळे जनतेने खबरदारी घ्यावी, मुखपट्ट्यांचा वापर करावा आणि फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

ग्रामीण भागात करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे, त्याला आळा घालण्याचा प्रत्येक सरकार प्रयत्न करीत आहे, ग्रामीण भागात जनजागृती करणे आणि पंचायत संस्थांचे सहकार्य त्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. वैद्यकीय क्षेत्र, शास्त्रज्ञ आणि सशस्त्र दले करोनाशी अहोरात्र लढत आहेत, देशांतर्गत उत्पादन आणि आयातीद्वारे औषधांच्या पुरवठ्यात वाढ केली जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने प्राणवायूचे प्रकल्प उभारले आहेत, औषधे आणि प्राणवायूच्या र्सिंलडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मोदी यांनी राज्य सरकारांना दिले आहेत, आपण लढा देऊ आणि विजयी होऊ, असेही ते म्हणाले.

करोना युद्धात विजय आपलाच!

नवी दिल्ली : देश सध्या अदृश्य शत्रूशी लढत आहे. करोनाची दुसरी लाट आली असून तिचा मुकाबला सरकार युद्धपातळीवर करीत आहे. या युद्धात आपलाच विजय होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. आतापर्यंत करोना लशींच्या १८ कोटी मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि जनतेचे वेगाने लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही मोदी म्हणाले.

करोनाने अनेकांच्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. जनतेला ज्या वेदना होत आहेत, तशा त्या मलाही होत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान