गुजरातमध्ये दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर वातावरण तापलं असताना काँग्रेस आमदार गेनीबेन ठाकोर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. गेनीबेन ठाकोर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या बोलताना दिसत आहेत की, ‘बलात्कारातील आरोपींना पोलिसांकडे सोपवण्याऐवजी जिवंत जाळलं पाहिजे’.

वाद वाढू लागल्यानंतर महिला आमदाराने बलात्काराच्या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड संताप असून आपण फक्त त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो असं म्हटलं आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडीओत गेनीबेन ठाकोर यांना महिलांनी गराडा घातल्याचं दिसत आहे. यावेळी महिलांना संबोधताना त्या बोलत आहेत की, ‘भारतात प्रत्येकाला कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा 50-150 लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच दिवशी बलात्कारातील आरोपीला जिवंत जाळलं पाहिजे. त्याला मारुन टाका, पोलिसांकडे सोपवू नका’.

आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं आहे की, ही 28 सप्टेंबरची घटना आहे. बलात्कारामुळे संतप्त झालेल्या महिलांना आपण शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. आरोपीला पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. आरोपी बिहारचा रहिवासी आहे. ठाकोर यांनी पुढे सांगितलं की, ‘हा व्हिडीओ माझ्या निवासस्थानी शूट करण्यात आला आहे. मी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी हे वक्तव्य केलेलं नाही. जवळपास 100 महिला तेथे जमल्या होत्या. त्यांना शांत करण्यासाठी आपण ते शब्द वापरले. याशिवाय दुसरा कोणता हेतू नव्हता’.