निर्भयाच्या आईची आरोपींना फाशी देण्याची मागणी
‘‘बलात्कारासारखा गलिच्छ गुन्हा करणारांच्या नजरा शरमेने झुकाव्यात. बलात्कारपीडित अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नव्हेत’’, अशा शब्दांत संताप व्यक्त करीत निर्भया बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मातेने आपल्या साहसी मुलीचे नाव उच्चारण्याचे धैर्य दाखविले. निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जंतरमंतर येथे जमलेल्या जनसमुदायालादेखील तिच्या नावाचा उच्चार करण्यास सांगत या मातेने आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला गुन्हेगार अल्पवयीन असल्याच्या सबबीखाली सुटत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.
तीन वर्षांपूर्वी १६ डिसेंबरला निर्भयावर नृशंस बलात्कार झाला होता. त्यावेळी बलात्काऱ्यांनी तिच्यावर केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे १३ दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. त्यावेळी अवघ्या देशभरात या नराधमांविरोधात संतापाची लाट उसळली होती. तिने मृत्यूशी दिलेली चिवट झुंज अपयशी ठरल्यानंतर सगळ्या जगभर हळहळ व्यक्त झाली होती. पण, तिच्या धैर्यशीलतेमुळे अवघा देश तिला ‘निर्भया’ नावाने ओळखू लागला होता. या दुर्घटनेच्या तिसऱ्या स्मरणदिनानिमित्ताने मात्र तिची आई आशादेवी यांनी आपल्या निर्भय मुलीचे नाव जाहीररीत्या घेतले. ‘‘आपल्या मुलीचे नाव ज्योती सिंग असे होते आणि मला तिचे नाव उच्चारण्यास बिल्कुल शरम वाटत नाही. लाज बलात्काऱ्यांना वाटावी. तिच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण अल्पवयीन गुन्हेगाराला सुटताना पाहत आहोत. यात कुठला न्याय आहे? तो १६ वर्षांचा आहे की १८ वर्षांचा, याबद्दल मला कल्पना नाही. परंतु, त्याने अतिशय क्रूर गुन्हा केला आहे.
अशा कृत्यांबद्दलच्या शिक्षेसाठी वयाची अट नसावी’’, अशा शब्दांत आशादेवी यांनी आपल्या मुलीवरील अत्याचाराचे परिमार्जन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.